मालेगाव : शहरातील महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना स्वाइन फ्लू आजार झाल्यास किंवा तशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर हाजी मो. इब्राहिम व मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात मनपाने शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. या आजारात ३ ते ५ दिवस सर्दी, साधा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, काही रोग्यांमध्ये तीव्र ताप, उलटी, जुलाब व श्वास फुलणे आदि लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करावेत तसेच सामान्य रुग्णालय, मनपाच्या वाडिया, अली अकबर या रुग्णालयांशी संपर्क साधावा व उपचार सुरू करून घ्यावेत. हा आजार गरोदर माता, स्तनदा माता, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना लवकर होतो. मनपा हद्दीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी वरील लक्षणे आढळताच टॅमिफ्लूचा औषधोपचार करावा तसेच रुग्णांना मनपाच्या रुग्णालयात पाठवावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना मनपाचे आवाहन
By admin | Updated: September 12, 2015 22:55 IST