नाशिक : महानगरपालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदार याद्यांवरून महापालिकेच्या मतदार याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे निवडणूक विभागातर्फे सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण नोंदणी कार्यक्रमात आपले नाव नोेंदण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपमहानगरप्रमुख नीलेश कुलकर्णी यांनी केले आहे.विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असल्याशिवाय नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या मतदारांना मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी आपले नाव विधानसभा मतदार यादीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. ज्या मतदारांची विधानसभा मतदार यादीत नावे नाहीत, अशा मतदारांनी मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्हा निवडणूक शाखेकडे नावे नोंदणी करून घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त, जिल्हा निवडणूक शाखेने केलेले आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून ८ आॅक्टोेबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून, त्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या व झालेल्या मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. त्याप्रमाणे मतदार यादीतील नावातील दुरुस्ती, नाव वगळणे, दुसऱ्या भागात समाविष्ट करणे आदि बाबही करता येणार आहे. याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदान केंद्र्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. (प्रतिनिधी)
पुनर्नोंदणी कार्यक्रमात सहभागी होण्याचे शिवसेनेचे मतदारांना आवाहन
By admin | Updated: October 17, 2015 22:14 IST