-------------------------------------------------------
न्यायडोंगरी येथे कोविड सेंटर मंजूर
नांदगाव : न्यायडोंगरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन सुविधांसह ३० खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर सुरू करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूरी दिली असून, लवकरच सदर केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
न्यायडोंगरी हे १५ हजार लोकसंख्या असलेले व आजूबाजूची १० ते १५ गांवाची बाजारपेठ असलेले गांव आहे. सद्यस्थितीत न्यायडोंगरी व परिसरात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठया प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून येत असल्याने येथे सदर केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी होती. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सभापती अश्विनी आहेर व स्थानिक पातळीवर ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी घटना व्यवस्थापक, जिल्हा आपत्ती प्राधिकरण तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी लीना बनसोडे यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांचे त्यासाठी सहकार्य मिळाले.