नाशिक : जिल्ह्यात डी.एल.एड. (डी.एड.) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आॅनलाइन अर्ज दाखल करून शासकीय अध्यापिका महाविद्यालयातील केंद्रावर १ आॅगस्टपर्यंत पडताळणी करून जमा करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राकडून करण्यात आले आहे. डी.एड. प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी नऊ जूनपासून सुरुवात झाली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रि येमुळे ती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ जुलै रोजी ही प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार २१ जुलैपासून आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ९ जूनला आॅनलाइन अर्ज भरला आहे त्या विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी एक आॅगस्टपर्यंत शासकीय अध्यापिका विद्यालयात जाऊन भरलेल्या अर्जाची पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी २४ अर्जांची विद्यार्थ्यांनी पडताळणी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डी.एल.एड.साठी ३१ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
By admin | Updated: July 25, 2016 00:33 IST