द्याने : कत्तलीसाठी पाच गायी व पाच गोऱ्हे घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यातील जनावरांची सुटका केली.ही घटना बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथे रात्री २.३०च्या सुमारास घडली. कत्तलीसाठी अवैधरीत्या गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व त्याच्या साथीदारांविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.अन्य तीन ते चार साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला आहे. परिसरात जनावरे चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडत असून, शेतकरी धास्तावल्याने पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.वाहनाजवळ पोलीस पोहोचले असता पाच गायींना अतिशय निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. तर वाहनाजवळ पाच गोऱ्हे बांधून ठेवले होते. वाहनाच्या आजूबाजूला बॅटरीने तपासणी केली तेव्हा तेथे दुचाकी (क्र. एम.एच.४१ एम.१११५) मिळून आली. पोलिसांनी गाव कामगार पोलीसपाटील संदीप अहिरे, सरपंच साहेबराव देसले, भगवान देसले यांना मदतीसाठी बोलवून दुचाकीची विचारपूस केली असता एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पिकअप चालक ( नाव माहीत नाही ) व त्याच्या अन्य तीन ते चार साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात प्राणिसंरक्षण सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक एस. के. गुंजाळ करीत आहेत.
कत्तलीसाठी जनावरे पकडली; एक ताब्यात
By admin | Updated: April 2, 2017 00:37 IST