रेडगाव खुर्द : परिसरातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी लासलगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत उपलब्ध बसची व्यवस्था तोकडी असल्याची बाब लासलगाव आगारप्रमुखांच्या निदर्शनास आणूनदेखील उपाययोजना करण्यात येत नसल्याने अखेर आज संतप्त विद्यार्थ्यांनी काळखोडे फाटा येथे सकाळी बस रोको आंदोलन केले.लासलगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी परिसरातील भडाणे, रायपूर, निंबाळे, गांगुर्डे वाडी, काळखोडे, वाहेगावसाळ, साळसाणे गावातून सकाळच्या सत्रात साधारण अडीचशे ते तीनशे विद्यार्थी जातात. यात विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. या सर्व पासधारक विद्यार्थ्यांना लासलगावला जाण्यासाठी सकाळच्या लासलगाव आगाराची मनमाडहून सुटणारी बस व एक ज्यादा बसची व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. परंतु मनमाडहून येणारी बस रायपूर येथेच प्रवाशांनी गच्च भरते. पुढे निंबाळे येथील थोडेफार विद्यार्थी कसेबसे कोंबून बसतात. त्या नंतर येणारी ज्यादा बस वऱ्हाडासारखी भरूनदेखील शेकडो विद्यार्थी खाली राहतात. या विद्यार्थ्यांना साडेआठ, नऊ शिवाय बस नसल्याने त्यांचे पहिले दोन-तीन तास वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होते. याबाबत लासलगाव आगारप्रमुखांना कळवून नवीन गाडीची मागणी वारंवार केली. मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज संतप्त विद्यार्थ्यांनी काळखोडे फाटा येथे बस रोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी एकीकडे शिक्षण घ्या म्हणायचे अन् दुसरीकडे साधी बसची व्यवस्था देण्यास टाळाटाळ करायची या शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली बस
By admin | Updated: July 26, 2014 00:48 IST