नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन जलतरणाच्या स्पर्धेत मूळ नाशिककर असलेल्या एंजल मोरे या युवतीने ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ हा बहुमान प्राप्त केला आहे. सलगपणे तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी दोन हात केल्यानंतर इंग्लिश खाडी पार करून तिने हे असामान्य यश मिळविले.
मूळ नाशिकच्या मोरे परिवारातील सदस्य असलेल्या एंजल मोरेने, मॅरेथॉन जलतरणाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाला गवसणी घातली आहे. एंजलचा या मोहिमेतील अत्यंत खडतर जलप्रवास इंग्लंड ते फ्रान्स असा होता. खाडी ओलांडण्याचे हे अंतर, म्हणजेच चॅनल क्रॉसिंग ४५.१ किलोमीटर इतके प्रदीर्घ होते. एंजलसह अन्य आठ स्वतंत्र एकल जलतरणपटू आणि दोन रिले संघ ग्रीनिच मध्यवर्ती वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता मोहिमेवर निघाले. सोसाट्याचा वारा आणि पाण्याच्या प्रचंड वेगाने त्यांच्या पुढे आव्हान उभे केले. त्यामुळे त्यातील पाच जलतरणपटू माघारी फिरले. मात्र, एंजलने अतिशय धीरोदात्तपणे आणि धाडसाने या आव्हानाचा सामना करून अतुलनीय यश मिळविले. मॅरेथॉन जलतरणाचा ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ मिळविण्यासाठी इंग्लिश खाडीबरोबरच (३३ किलोमीटर) वीस पूल पार करावे लागणारी मॅनहॅटन जलतरण मोहीम (४५.९ किलोमीटर) फत्ते करावी लागते. एंजलने ती गत महिन्यांतच ९ तास १ मिनिट अशा वेळेत पूर्ण केली होती. तत्पूर्वी याचा अन्य तिसरा निकष असणारी कॅटालिना खाडीदेखील ( ३२.३ किलोमीटर) तिने १४ तास २२ मिनिटे या कालावधीत पार केली होती. एंजल पाच वर्षांची असल्यापासून पोहते. एंजल सध्या अठरा वर्षांची असून ‘यूसीएलए’ची विद्यार्थिनी आहे.
इन्फो
नियमावलीचे काटेकोर पालन
एंजल मूळची नाशिक येथील मोरे परिवारातील आहे. ज्येष्ठ संगणक अभियंता तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक हेमंत आणि अर्चना मोरे यांची ती कन्या असून, व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक झाले आहे. मॅरेथॉन जलतरणाचे नियम कठोर आहेत. ओला पेहराव तसेच कोणतीही स्थिर वस्तू, बोट किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यास स्पर्धक अपात्र ठरतात. त्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे काटेकोरपणे पालन करीत मिळविलेले एंजलचे यश लक्षवेधी ठरते.
फोटो
२३एंजल मोरे