पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानासाठी आखाडे तसेच खालशाचे महंत व त्यांच्यासमवेत काही भाविकही सकाळी रामकुंडावर जाण्यासाठी मिरवणुकीत दाखल झाल्यानंतर काही काळ तपोवन साधुग्राममध्ये शुकशुकाट पसरलेला होता. शाहीस्नानाच्या क्रमवारीनुसार आखाड्यांचे रामकुंडावर शाहीस्नान झाल्यानंतर आखाडे व खालशांचे महंत दाखल झाल्यानंतर भाविकांना स्नानासाठी सोडण्यात आले. साधू-महंतांच्या स्नानानंतर शाहीस्नानासाठी दाखल झालेल्या भाविकांनी रामकुंड तसेच कपिला संगमावर स्नान केल्यानंतर काही भाविक तपोवन साधुग्राम बघण्यासाठी तसेच साधू-महंतांच्या दर्शनासाठी तपोवनात दाखल झाल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर तपोवन भाविकांच्या गर्दीने फुलले असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी सहा वाजता परंपरेनुसार आखाड्याच्या शाही मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर साधू-महंत सवाद्य मिरवणुकीत सहभागी होऊन रामकुंडाकडे गेले होते. त्यानंतर पाच ते सहा तास साधुग्राम परिसरात शुकशुकाट तर पसरलेला होताच शिवाय भाविकांची गर्दीही मंदावलेली होती. साधू-महंतांचे शाहीस्नानानंतर पुन्हा तपोवनात आगमन झाल्यानंतर स्नान करून भाविकांनी तपोवनाकडे धाव घेतल्याने दुपारच्या वेळी संपूर्ण रस्ते भाविकांच्या गर्दीने भरगच्च झालेले होते. कपिला संगम, साधुग्राम सेक्टर एक व दोनमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. त्यामुळे तपोवनात पुन्हा रामनामाचा, भजनाचा गजर सुरू झाला होता. (वार्ताहर)
...आणि पुन्हा फुलले साधुग्राम
By admin | Updated: August 29, 2015 22:53 IST