पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीसाठी विविध राज्यांतून तपोवन साधुग्राममध्ये दाखल झालेले भाविक पहिल्या शाहीस्नानानंतर पुन्हा आपापल्या घराकडे परतल्याने सध्या साधुग्राममध्ये शुकशुकाट आहे.ऐरवी जनार्दन स्वामी आश्रमाजवळील साधुग्राम प्रवेशद्वार ते तपोवन लक्ष्मीनारायण मंदिर, तसेच कपिला संगमचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जायचा, याशिवाय साधुग्राममधील साधू-महंतांचे आखाडे, तसेच वर्दळ राहिल्याने गजबजलेले रस्ते आता पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानापूर्वी तपोवनात दाखल झालेल्या अनेक भाविकांनी आखाड्याचे पंडाल, मंदिर परिसर व रस्त्यालगतच्या पादचारी मार्गावर मुक्काम ठोकला होता. याशिवाय भोजन पंक्तींमुळे रस्तेदेखील भरगच्च व्हायचे. मात्र आता पहिल्याच पर्वणीनंतर हे सर्व चित्र पालटले आहे. भाविकांपाठोपाठ जवळपास २५ टक्के साधू-महंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यासाठी आपापल्या मंदिर, मठांकडे रवाना झालेले आहेत.भाविकांची संख्या रोडावल्यामुळे सध्या तपोवन साधुग्राममध्ये शुकशुकाट पसरला आहे. पर्वणीपूर्वी बाहेरगावचे भाविक भोजन प्रसादासाठी रस्त्याने ये-जा करणाऱ्या भाविकांना बोलवावे लागत असल्याचे चित्र मागील २-३ दिवसांपासून दिसून येत आहे.साधुग्राममधील आखाडे तसेच खालशात दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू असले तरी बोटावर मोजण्याइतकेच भाविक या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक व साधू-महंत पुन्हा तपोवनात हजेरी लावतील व त्यानंतर दुसऱ्या पर्वणीला गर्दी होईल, असे साधू-महंत सांगत आहे. साधुग्राममध्ये सध्या कमालीची शांतता असल्याने बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारीदेखील दुपारच्या वेळी आखाड्यात डुलकी घेताना दिसत आहेत. (वार्ताहर)
...अन् साधुग्राममध्ये पसरला शुकशुकाट
By admin | Updated: September 4, 2015 00:42 IST