शैलेश कर्पे ल्ल सिन्नरघरी अठराविसे दारिद्र्य.. वडिलांना दारूचे व्यसन.. आई परपुरुषासोबत घर सोडून गेलेली.. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी वयात आलेली युवती वाट चुकणे साहजिक आहे. वेश्या व्यवसायाच्या दलदलित रुतल्यानंतर काही वर्षांनंतर तिला तिची चूक उमगते. या जोखंडातून बाहेर पडण्यासाठी मोठी धडपड करते; मात्र त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कठीण असल्याने ती हतबल होते. अशा परिस्थितीत तिच्या मदतीला पोलीस अधिकाऱ्याच्या रूपाने ‘पुंडलिक’ भेटतो आणि गुलामगिरीच्या साखळदंडातून तिची सुटका होते. पुंडलिक सपकाळेनामक पोलीस अधिकाऱ्याने तिची केवळ वेश्या व्यवसायातून सुटका केली नाही तर तिला जीवनसाथी मिळवून देत ‘संसार’ बंधनात अडकवून दिल्याची हृदयस्पर्शी घटना सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहत क्षेत्रात घडली.मूळ नाशिक येथील रहिवासी असलेल्या एकुलत्या एक मुलीच्या नशिबी तसा वनवास. वडील व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आई घर सोडून मुंबईला गेली. मातापित्याचे संस्कार न मिळाल्याने तिचे पाऊल वाकडे पडले. एक महिला तिला नाशिकच्या भद्रकाली भागात देहविक्रीच्या व्यवसायाकडे घेऊन गेली. पैसे मिळवून देणाऱ्या या व्यवसायात पडणे सोपे मात्र त्यातून बाहेर पडणे अवघड असल्याची जाणीव तिला होऊ लागली.वारांगना बनलेल्या या युवतीची नंतर फरफट सुरू झाली. वेश्या व्यवसाय चालविणारी मालकीण सांगेल त्या ठिकाणी तिला जाणे भाग पडले. भद्रकालीनंतर मालेगाव, मनमाड व नंतर सिन्नरजवळील मुसळगावच्या कुंटणखान्यावर तिला जबरदस्तीने जावे लागले. या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी तिची धडपड सुरू होती. मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने पोलीस ठाणे सुरू झाल्याचे तिला समजले. एक दिवस तिने कुंटणखान्यावरील सर्वांची नजर चुकवून एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांची भेट घेण्यासाठी एक २५ वर्षीय युवती आल्यानंतर त्यांनी काम विचारले. काहीशी घाबरलेली ही युवती अगोदर काहीच बोलत नव्हती. त्यानंतर मदत पाहिजे म्हणून सपकाळे यांच्याकडे आर्जव करू लागली मात्र काम सांगत नव्हती. डबडबलेले डोळे पुसल्यानंतर थोड्यावेळाने तिने आपण वाट चुकून या व्यवसायात पडल्याची कबुली दिली. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने सपकाळे यांच्याकडे विनंती केली. सपकाळे यांनी तिला धीर देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या व्यवसायातून बाहेर पडताना येणाऱ्या अडचणी सांगून गुंडांकडून त्रास होण्याची भीतीही व्यक्त केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी संबंधितांसोबत चर्चा केली. यापुढे या युवतीला कोणताही त्रास होणार नाही याची हमीच त्यांनी त्यांच्याकडून घेतली.या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न होताच त्यावर या युवतीने एका युवकासोबत ओळख असून, त्याच्यासोबत विवाह करण्याचा मानस सपकाळे यांच्याकडे व्यक्त केला. मुलगा परजिल्ह्यातील असल्याने सपकाळे यांनी त्याला बोलावून घेतले. या युवतीची पार्श्वभूमी त्याला माहीत होती. अशा परिस्थितीत त्याने तिचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार करण्यास संमती दर्शविली.निरीक्षक सपकाळे यांनी स्वत: त्यांचा विवाह लावून देण्यास पुढाकार घेतला. सपकाळे यांनी दोघांच्या नातेवाइकांना बोलावून त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे सांगत विवाह लावून देण्याची विनंती केली. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून देण्यात आला. या विवाह सोहळ्यास पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात हजेरी लावली. निरीक्षक सपकाळे यांनी पुढाकार घेत या युवतीला केवळ वेश्या व्यवसायातून बाहेर काढले असे नाही तर तिला संसाराच्या बेडीत अडकवून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
...अन् वेश्या व्यवसायाचा पाश झाला मोकळा !
By admin | Updated: November 25, 2015 22:08 IST