वाडीवऱ्हे : मोनियार कंपनी कामगारांच्या मागण्या बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीमध्ये बेरोजगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, वाडीवऱ्हे शिवारातील मोनियार प्रा. लिमिटेड कंपनीने ३२ कामगारांना निलंबित केल्यामुळे या कामगारांनी मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र उपोषणाचा दुसरा दिवसाला सुरुवात झाली तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या बेरोजगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नसल्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालय, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे, तहसीलदार इगतपुरी, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, कामावर घेण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून सदर कामगारांनी केली आहे. या संदर्भात कामगार मंत्री तसेच खासदार हेमंत गोडसे यांनादेखील निवेदने देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तेही असफल ठरले असल्याने कामगारांना नऊ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. मात्र इतर कंत्राटी पद्धतीने कामगार भरून कंपनी व्यवस्थापनाने उत्पादन सुरू ठेवले आहे. या उपोषणात मोहन महाले, विनोद महाले, शरद कोठुळे, दत्तू गायकर, सुरेश कातोरे, नितीन आरोटे, सुदाम कातोरे, किरण कोठुळे, समाधान कातोरे, तुकाराम महाले, बहिरू कडलग, माणिक कातोरे, किरण गाडेकर, सचिन महाले, प्रकाश महाले, तुकाराम नाठे, शांताराम मातेरे, विष्णू धोंगडे, गोरख धिंडाळे आदि ३२ कामगार उपोषणास बसले आहेत. (वार्ताहर)
आमरण उपोषण
By admin | Updated: August 17, 2016 23:55 IST