नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत होणाऱ्या विविध फेरबदलामुळे रेशन दुकाने बंद करण्याची वेळ आलेल्या व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या दुकानदारांना दिलासा देण्यासाठी शासनाने काही जीवनावश्यक वस्तूंची रेशन दुकानांतून विक्री करण्याची परवानगी बहाल केली आहे. ऐन सणासुदीत हा निर्णय घेतल्याने दुकानदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन दुकानांमधून आता फक्त अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ घेणारे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे यांनाच स्वस्त धान्याचा लाभ होत आहे, तर ज्यांच्याकडे गॅस सिलिंडर नसेल अशा शिधापत्रिकाधारकांनाच घासलेट देण्याचे शासनाने अलीकडेच धोरण स्वीकारल्याने त्याचा परिणाम रेशन दुकानदारांच्या मासिक कमिशनवर होत आहे. अनेक दुकानदारांनी परवडत नसल्याचे कारण देत, परवाने परत करण्यास सुरुवात केली, तर ज्यांनी वर्षानुवर्षे शासनाच्या या उपक्रमास हातभार लावला ते दुकानदार मेटाकुटीस आल्याने शासनाने एकतर रेशन दुकानदारांना मासिक वेतन द्यावे किंवा त्यांना रेशन दुकानांमधून अन्य वस्तू विक्रीची अनुमती द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनमधून दिल्या जाणाऱ्या स्वस्त दरातील गहू, तांदूळ या खेरीज खुल्या बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या गव्हाच्या चार जाती, तांदळाच्या अकरा जातींची खुल्या बाजारभावानुसार विक्रीची अनुमती दिली. त्याचबरोबर खाद्यतेल, पामतेल, कडधान्य, डाळी, गूळ व शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपाला या वस्तूंच्या विक्रीची मुभा दिली आहे. (प्रतिनिधी)
रेशनवर तेल, डाळ, रवा विक्रीची अनुमती
By admin | Updated: October 25, 2016 01:41 IST