ाालेगाव : येथील अक्सा कॉलनीतील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर कथित अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त जमावाने शालेय साहित्याची जाळपोळ करण्याबरोबरच पोलिसांवरही दगडफेक केल्याची तसेच पोलीस वाहनांना आग लावल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. यात दोन पोलीस वाहनांसह सहा खासगी गाड्यांना आग लावण्यात आल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. अक्सा कॉलनीतील मदर आयेशा या उर्दू शाळेतील साडेचार वर्षाच्या बालिकेवर येथील सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसापूर्वी अत्याचार केल्याची तक्रार करायला तिचे पालक शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मुख्याध्यापकांकडे गेले असता सदर वार्ता परिसरात समजल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी अन्य पालकही एकत्र आले व त्यांनी एकत्र होत शाळेभोवती गराडा घातला. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात समाधानकारक उत्तर न दिल्याने जमाव संतप्त झाला. त्याने शाळेवर आपला राग काढतानाच परिस्थिती हाताळण्यासाठी दाखल झालेल्या पोलीस यंत्रणेवरही आपला राग काढला. यावेळी जमावाने प्रथम शाळेतील बाके व कागदपत्रांसह इतर साहित्य मैदानात काढून त्यांना आग लावून पेटवून दिले. तर पोलिसांवरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रारंभी पोलिसांनी समजूतदारीची भूमिका घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; जमाव अनावर होत असला तरी पोलीस बळ अपुरे पडल्याने जमाव अधिक उग्र झाला. यात अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या वाहनांसह दंगा नियंत्रण पथकाचे वाहन तसेच परिसरातील अन्य खासगी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. सुमारे तीन तास चाललेल्या या गोंधळानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांचे मालेगाव शहरात आगमन झाले. तत्पूर्वी पोलिसांनी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांचे बळ एकवटून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी संतप्त जमावाने ‘लोकमत’चे वार्ताहर प्रवीण साळुंखे यांना मारहाण करण्याची घटना घडली.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार : परिस्थिती नियंत्रणात
By admin | Updated: April 9, 2016 01:03 IST