लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट नाशिकच्या भोसला सैनिकी विद्यालयात कर्नल पुरोहित यांनी शिजवल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आरोपी प्रज्ञासिंह यांना नाशिकच्या गणेशवाडीतील आयुर्वेद रुग्णालयात दाखल करून तब्बल चार महिने उपचार करण्यात आले होते. त्यामुळे या बॉम्बस्फोटप्रकरणी नाशिक केंद्रस्थानी चर्चेत आले होते.
प्रकरणाचा एटीएसकडून तपास सुरू असतानाच कर्नल पुरोहित यांना आरोपी म्हणून पकडण्यात आले. तेव्हा एटीएसच्या तपासात कर्नल पुरोहित यांनी नाशिकच्या भोसला सैनिकी स्कूलमध्ये बैठक घेतली होती आणि त्यात हा कट शिजल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या दृष्टीनेही तपास झाला होता. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथे सैनिकी स्कूल चालवले जाते. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही बैठका भोसलात झाल्याचा संस्था संचालकांनी इन्कार केला होता.
माजी आ. सानप यांच्याकडे जबाबदारी
साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर पंचवटीतील गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात उपचार सुरू असताना साध्वींसह त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी तत्कालीन भाजप नगरसेवक आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे होती. साध्वींच्या घरातील तीन व्यक्ती त्यावेळी नाशिकला होत्या. साध्वी यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना सानप यांनी त्यांच्या घरी नेले होते.
आयुर्वेदिक रूग्णालयात उपचार
आता निकालामुळे संस्थेवरील आरोप खोटे असल्याची पुष्टी झाल्याची भावना संस्थाचालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
खटल्यासाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात येत असतानाच्या काळात साध्वी प्रज्ञासिंह यांना मस्क्युलर स्केलेटन पेन तसेच हृदयरोगाचाही त्रास झाला. विशेष म्हणजे त्यांचा केवळ भारतीय म्हणजेच आयुर्वेदिक उपचारांवरच विश्वास असल्याने त्यांना गणेशवाडीच्या आयुर्वेदिक रुग्णालयात दररोज पंचकर्मासह अन्य उपचार केले जात होते.
आयुर्वेद सेवा संघाचे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ (स्व.) वैद्य मामा राजपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य एकनाथ कुलकर्णी आणि वैद्य राजन कुलकर्णी यांनी त्यांच्यावर उपचार केले होते.