नाशिक : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छ इंधन पुरविणाऱ्या प्रधानमंत्री उजाला योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा नव्याने ३० हजार जोडणी तेल कंपन्यांनी मंजूर केली असून, मार्चच्या अखेरच्या दिवशी देण्यात आलेले उद्दिष्टपूर्तीसाठी तेल कंपन्या व गॅस एजन्सीचालकांची धावपळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्णात प्रधानमंत्री उजाला योजनेंतर्गत गॅस कंपन्यांनी गेल्यावर्षी आॅगष्ट महिन्यात जिल्ह्णातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा शोध घेतला होता. त्यासाठी ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. साधारणत: ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून सरपण, गोवऱ्या, कोळश्याचा वापर केला जात असल्याने अशा कुटुंबांना प्रधानमंत्री उजाला योजनेंतर्गत गॅस जोडणी देण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७१ हजार ६४५ इतके कुटुंबांचा शोध घेण्यात आला, तथापि, नाशिक जिल्ह्णाला दहा हजार जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आल्याने आॅक्टोबर महिन्यातच १०७३५ कुटुंबाना गॅस जोडणी देण्यात आली, उर्वरित जवळपास ६० हजार कुटुंबे जोडणीच्या प्रतीक्षेत होती. या संदर्भात शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने मार्चअखेरीस पुन्हा उजाला योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्णात यासाठी ३० हजार नवीन जोडणी देण्यात येणार असून, दोन दिवसांतच ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश तेल कंपन्यांनी गॅस एजन्सीचालकांना दिले आहेत. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची हाती असलेल्या माहितीच्या आधारे गॅस जोडणी देण्यासाठी धावपळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
‘उजाला’ योजनेचे उद्दिष्ट वाढले
By admin | Updated: April 1, 2017 01:48 IST