नाशिक : इंदिरानगरचा बोगदा पूर्वसूचना न देता बंद केल्याने नागरिकांच्या भावना चांगल्याच उफाळून आल्या असून, नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी हरकती नोंदविण्याचे आवाहन केले असता, त्यात अनेक नागरिकांनी आपली मते निर्भिडपणे व्यक्त केले. बोगदा बंदमुळे होणारा फेरा पाहता वेळ व इंधनात पैसा खर्च होत असल्याने पोलिसांनीच प्रत्येक वाहनचालकांना पैसे द्यावेत, अशी मागणी करून दडपशाहीपद्धतीने जर बोगदा बंद करणार असाल तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, बोगदा बंदच्या विरोधात इंदिरानगरच्या नागरिकांनी राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत चौथ्या दिवशी चारशे नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर नगरसेवक कुलकर्णी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन जवळपास दिडशेहून अधिक नागरिकांनी लेखी स्वरूपात ‘बोगदा बंद’ केल्याबद्दल आपले मत नोंदविले आहे. त्यात आपल्या भावना मोकळ्या करताना पोलिसांनी नागरिकांना विश्वासात न घेता, दडपशाही चालविली असल्याची बहुसंख्य नागरिकांनी तक्रार केली आहे. बोगदा बंद केल्याने होणारी गैरसोय सविस्तर मांडताना वळण घेऊन करावी लागणारी कसरत अपघाताला आमंत्रण देणारी असून, दोन ते तीन किलोमीटरचा फेरा मारणे म्हणजे वेळ व पैसा वाया घालविण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. बोगदा बंद झाल्याने त्या ठिकाणची वाहतुकीची कोंडी बंद झाली असली तरी ज्या ज्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली अशा ठिकाणांवर वाहतूक जाम होऊ लागली आहे. मुंबईनाका, हॉटेल संदीप, चांडक सर्कल, मायको सर्कल या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढल्याचेही निरीक्षण काही नागरिकांनी नोंदविले आहे. बोगदा बंद झाल्यामुळे गोविंदनगरला सहा पदरी बांधलेला रस्ता बिनकामाचा ठरला असून, त्यावर केलेला खर्चही वाया गेल्याने महापालिकेने पोलीस खात्याकडून त्याची भरपाई मागावी, अशी सूचनाही एका नागरिकाने केली आहे. पोलीस यंत्रणेचे कामच असून, बोगद्याजवळ होणारी कोंडी ते फोडू शकत नाही, म्हणजेच त्यांची कार्यक्षमता नसल्याचा टोलाही एकाने लगावला आहे. वाहतुकीचे नियोजन करता येत नसेल तर त्याचा दोष वाहनचालकांना देण्यात काय अर्थ, असेही पुढे म्हटले आहे. पोलिसांनी जनभावनेचा आदर करून वाहतुकीचे नियोजन करावे, नागरिकही त्याला साथ देतील; परंतु कोणताही निर्णय लादू नये अन्यथा लोकांनाच त्यांच्याविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आंदोलन सुरूच : बोगद्याप्रश्नी हरकतदारांच्या तीव्र भावना
By admin | Updated: July 29, 2015 00:32 IST