न्यायडोंगरी- छोट्या सचिवालयाच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर पुन्हा नव्याने प्रसाधनगृह बांधण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी २०१३-१४ च्या सुधारित अर्थसंकल्पात प्रसाधनगृहासाठी ४,४२,००० रुपयांची तरतूद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दोन महिन्यांपूर्वी सर्व सोयीसुविधा असलेल्या या कार्यालयाच्या इमारतीचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. पंचायत समितीसह काही कार्यालये येथे स्थलांतरीतही झाली असून, कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे, असे असताना पंचायत समितीच्या सुधारित अर्थसंकल्पात प्रसाधनगृहाचा ठराव आहे. नवीन कार्यालयात प्रसाधनगृहासह सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या येणार्या जाणार्या नागरिकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेऊन बांधकाम केले असताना आणखी प्रसाधनगृहाची गरजच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आशयाची लेखी तक्रार पंचायत समितीचे विरोधी गटनेते शशिकांत मोरे यांनी महसूल आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.सदर ठरावाची चर्चा सभागृह मासिक सभेला झाली नसताना इतिवृत्तात कसे काय घेतले गेले असा सवालही मोरे यांनी केला आहे. (वार्ताहर)
सुसज्ज इमारतीच्या लोकार्पणानंतर प्रसाधनगृहाच्या निर्मितीचा घाट
By admin | Updated: May 14, 2014 00:05 IST