लासलगाव : पाच तासांच्या जोरदार प्रयत्नानंतर तिघा जणांना जबर जखमी करणाऱ्या बिबट्याला टाकळी (विंचूर) परिसरात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.मंगळवारी सकाळी टाकळी (विंचूर) परिसरात बिबट्याने तीन इसमांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान पाच तासांच्या जोरदार प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. पाच ते सहा वर्ष वयाचाबिबट्या लासलगावजवळील टाकळी (विंचूर) परिसरात फिरताना आढळून आला. माधवराव पाचोरकर यांना बिबट्या द्राक्षबागेत लपलेला दिसताच त्यांनी घरी येऊन ही माहिती टाकळीचे उपसरपंच शिवा सुरासे यांना दिली. त्यांनी तातडीने लासलगाव पोलीस ठाणे व वनविभागाचे येवल्याचे अधिकारी बी.आर. ढाकरे यांना माहिती दिली.द्राक्षबागेत काम करणारे बाळू सुरासे यांच्यावर त्याने हल्ला चढवला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना बिबट्याने बाळू यांच्या पोटावर पंजाने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जवळ असलेल्या शांताराम सुरासे यांच्या घरामागील भागात गेला. घराबाहेर बसलेले वडील पुंजाबा सुरासे यांच्या डाव्या हातावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर देवीदास सुरासे यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले.शेजारी राहणारा मुलगा विक्रम ही घटना पाहून धावून आला. त्याने वडील व पुतण्याला घरात ओढून घरात नेत असतानाच बिबट्यानेही घरात प्रवेश केला. विक्रमची त्यावेळी तारांबळ उडाली. त्याने जवळ पडलेली बदली हातात घेऊन बिबट्याला मारले. बिबट्या मागे सरकताच विक्र मने जखमी वडील व पुतण्याला घराबाहेर काढत घराचे दार बंद करून बिबट्याला कोंडले. त्यानंतर आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. (वार्ताहर)
पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद
By admin | Updated: March 8, 2016 22:40 IST