निफाड : काही दिवसांपासून निफाड शिवारातील वीजपुरवठा खंडित केला गेल्याने तो सुरळीत करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली निफाड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला.गेल्या काही दिवसांपासून निफाड व शिवारातील कादवा व वडाळी नदीलगतच्या विहिरींवरील वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे ऊस, द्राक्ष ही पिके करपू लागली आहेत. तसेच जनावरांना प्यायला पाणी नसल्याने विजेअभावी त्यांचे हाल होत होते, म्हणून आज राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी दणका आंदोलन करून सहायक अभियंता वाणी यांना अनिल कुंदे त्यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १ वाजता निवेदन दिले व कार्यालयातच ठिय्या दिला. वीजपुरवठा सुरळीत करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिला, असा पवित्रा घेतला. नंतर वीज वितरण कार्यालयास २ वाजता टाळे ठोकण्यात आले, टाळे ठोकल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनिल कुंदे, बापूसाहेब कुंदे, रमेश जाधव, धनंजय तांबे, सुनील गाजरे, हरिभाऊ बनकर, राजाभाऊ ढेपले, सुनील बागडे, भाऊसाहेब कापसे, बाजीराव आव्हाड व अनेक शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
शेतकऱ्यांनी टाळे ठोकल्यानंतर वीजपुरवठा सुरू
By admin | Updated: April 12, 2016 23:48 IST