नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात बेमुदत आंदोेलन करणाऱ्या ग्रामसेवक संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. गुरुवार (दि. १७) पासून सर्व ग्रामसेवक नियमित सेवेत हजर राहणार आहेत.गेल्या आठवडाभरापासून ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मुंबईला आझाद मैदानावर विभागनिहाय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून सरकार दरबारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्या वेळोवेळी मांडून व त्यासंदर्भात बैठका घेऊनही सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने अखेर ग्रामसेवक युनियनने आंदोलनाचे पाऊल उचलले होते. बुधवारी (दि. १६) यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यावेळी महिनाभरात यातील बहुतांश मागण्यांवर सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एल. जी. गायकवाड, सरचिटणीस अतुल वर्मा, उपाध्यक्ष खाशाबा जाधव, कोषाध्यक्ष बापू अहिरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामसेवकांचे आंदोलन मागे
By admin | Updated: July 17, 2014 00:27 IST