पंचवटी : प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या डझनभर असून, नाराज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याशी बंड पुकारून स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रभागातील अकरा नाराज इच्छुकांनी शिवसेनेने दोघांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव मांडला असून, सेनेने तो प्रस्ताव मान्य केल्यास तत्काळ शिवसेनेत प्रवेश करणार आणि प्रस्ताव मान्य झाला नाही तर स्वतंत्र चार उमेदवारांचे पॅनल उभे करून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांची हिरावाडी रोडवरील भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरात बैठक झाली. त्याच बैठकीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक विनायक खैरे यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी ऐकून घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात काम करूनही संधी मिळत नसल्याने नाराज कार्यकर्त्यांनी थेट आमदारांविरोधात जाण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी या नाराज गटाने चर्चा करून आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग ३ मधून नाराज कार्यकर्त्यांपैकी दोघांना उमेदवारी दिली तर सेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. कार्यकर्त्यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर उमेदवारीचा प्रस्ताव मांडला असून, सेनेने तो प्रस्ताव मान्य केल्यास नाराज भाजपेयी तत्काळ सेनेत प्रवेश करतील व सेनेने प्रस्ताव फेटाळला तर सर्व नाराज भाजपा कार्यकर्ते स्वतंत्र चार उमेदवारांचे पॅनल उभे केले आहे. (वार्ताहर)
उमेदवारीचा प्रस्ताव मान्य केल्यास शिवसेनेत प्रवेश
By admin | Updated: January 20, 2017 23:43 IST