नाशिक : नाशिकमध्ये रंगणाऱ्या रहाडींमधील रंगपंचमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने आजही शहरातील अनेक भागात रहाडींमध्ये रंग खेळला जातो. रहाडीची परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्व असल्याने अवघे नाशिककर दरवर्षी रहाडीतील रंगात रंगून जातात. नाशिकची रंगपंचमी ओळखली जाते ती रहाडींमुळेच. शहरात काही पुरातन रहाडी असून, आणखी एका रहाडचा शोध लागला आहे. तब्बल ४० वर्षांनंतर या रहाडविषयी तांबट आळीतील नागरिकांना माहिती झाली आहे. यंदा ही रहाड रंगपंचमीला खुली केली जाणार आहे. नाशिकमध्ये तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, शनि चौक येथे पुरातन आणि पेशवेकालीन रंगांच्या रहाडी आहेत. या रहाडींमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळली जाते. नाशिकची रंगपंचमी आणि रहाड यांचे घट्ट नाते असून, देश-विदेशात नाशिकची रंगपंचमी रहाडींसाठी ओळखली जाते. तांबट आळीत आणखी एक रहाड आता सज्ज झाली आहे. मनोज लोणारी यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन ही रहाड समोर आणली आहे. लोणारी यांच्या वडिलांकडून त्यांना तांबट आळीतील रहाडीबाबत माहिती मिळाली. त्याबरोबरच त्यांनी परिसरातील आणखी काही ज्येष्ठ आणि वयोवृद्धांशी चर्चा केल्यानंतर तांबट आळीतील रहाडीबाबत त्यांना तथ्य आढळले. आपल्या गल्लीतीलच रहाड गेल्या ४० वर्षांपासून बंद असल्याने ती खुली झाली पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवक गजानन शेलार आणि राहुल शेलार यांचे त्यांना सहकार्य लाभले. परिसरातील मंडळे एकत्र आली आणि रहाडीचा शोध सुरू झाला. एका ठिकाणी खोदकाम करण्यात आल्यानंतर रहाड नसल्याचे लक्षात आले. निराश न होता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर तेथे १६ फूट खोल रहाड आढळून आली. खोदकाम करताना दगडी चिऱ्यांचा हौद सापडला. १८ बाय १८ आकाराचा हौद पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली. ४० वर्षांनंतर रहाड सुरू होईल, याचा आनंद व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)
४० वर्षांनंतर पुरातन रहाड खुली
By admin | Updated: March 13, 2017 23:26 IST