नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर शनिवारी (दि. ०३) कोरोना बळींच्या दिवसभरातील बळींच्या संख्येतही अचानकपणे वाढ दिसून आली असून तब्बल २३ दिवसांनंतर बळींचा आकडा पुन्हा दुहेरी आकड्यात पोहोचला आहे. शनिवारी गेलेल्या १३ बळींमुळे आतापर्यंत गेलेल्या बळींची संख्या ८,३७१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शनिवारी २३१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. शनिवारी गेलेल्या १३ बळींमध्ये नाशिक ग्रामीणच्या तब्बल १२ बळींचा समावेश असून, एक बळी नाशिक मनपा क्षेत्रातील गेला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा बहर ओसरू लागल्यापासून एका दिवसात केवळ १२ जूनला २७ बळींची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने सर्व बळी एक अंकी आकड्यात असून थेट शनिवारीच हा आकडा दुहेरी आकड्यात पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा नाशिकमध्ये कोरोना रुग्ण आणि बळी वाढण्यास प्रारंभ झाला की काय, अशा चर्चेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान शनिवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या काहीशी अधिक असल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या २,२७३ पर्यंत खाली आली आहे. तर प्रलंबित अहवालांची संख्यादेखील हजारपेक्षा कमी होऊन ९४७ वर आली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णसंख्येचा दर ९७.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.