सिडको : मोरवाडी येथील टी. जे. चव्हाण हायस्कूलच्या १०तील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.शाळा तीच अन् वर्गही तोच, असा अनुभव तब्बल २२ वर्षांनंतर प्रत्यक्ष पाहिला व अनुभवता आल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सन १९९३ मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा दिला. गेल्या २२ वर्षांच्या कालावधीत काही जण नोकरी- व्यवसायात स्थिरावल्यानंतर पुन्हा विद्यार्थी मेळाव्यात शालेय जीवनात जाण्याची वेळ आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी वर्ग तासाला दांडी मारून केलेली दंगामस्ती, रुसवे-फुगवे, टिंगलटवाळी अशा साऱ्याच घटनांची यावेळी आठवण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुणी नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच लग्नानंतर कोणी बाहेरगावी स्थिरावले आहेत. या विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शाळेतील माजी विद्यार्थी कैलास चुंभळे, परमानंद पाटील, नीलेश गोमारे, राजू शिंदे, शीतल अहिरे, स्मिता बर्वे, सविता गवांडे यांनी केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव सुभाष पवार, शाळेच्या मुख्याध्यापक आशुमती टोणपे, पर्यवेक्षक साहेबराव अहिरे, ज्योती महाजन, संध्या जाधव, स्वाती पाटील, पंकजा ठाकूर, राजेंद्र चौधरी, दौलत भामरे, पाटील, शुक्ल आदि उपस्थित होते. या मेळाव्यास नाशिकसह गुजरात, सुरत, मुंबई, पुणे आदि विविध भागातून माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा
By admin | Updated: July 29, 2016 00:45 IST