दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच अनेक इच्छुकांना प्रथम नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले असून, अनेकांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केल्याने ऐन थंडीत दिंडोरीचे राजकीय वातावरण दिवसागणिक तापू लागले आहे. काही इच्छुक विविध राजकीय पक्षांच्या तिकिटाची चाचपणी करतानाच स्वबळाचा अंदाज घेत आहेत. नगरपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते सरसावले असून, स्वबळ बरोबरच आघाडी युती अन् विकास आघाडीनिर्मितीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने यात आघाडी घेत जवळपास आघाडी निश्चित करत काही उमेदवारही निश्चित करत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची वंदता आहे तर दोनतीन जागी उमेदवारीचा तिढा असल्याने आघाडीच्या घोषणेचा मुहूर्त लांबत असल्याचे सांगितले जात आहे.शिवसेना-भाजपा यांच्यात युती होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह असतानाच एका विकास आघाडीच्या बैठकीने वेगळीच चर्चा रंगू लागल्याने युती होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष स्वबळ अजमावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, नुकत्याच राज्यात व जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत मिळालेला भाजपाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आशा द्विगुणित झाल्या असून, युती होण्याच्या प्रक्रियेत जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. मनसे ही काही जागा लढविण्याच्या तयारीत असली तरी ते नेमक्या किती जागा लढविणार याची उत्सुकता आहे. तर रिपाइं कोणत्या पक्षासोबत जाणार याचीही उत्सुकता आहे. या निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून, काही प्रभागात भाऊबंदकी रंगण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. (वार्ताहर)
ऐन थंडीत राजकीय वातावरण तप्त
By admin | Updated: December 6, 2015 22:54 IST