सटाणा : एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, विनानुदानित शाळांवर शिक्षक पन्नास रु पये रोजाने काम करत आहेत, अशी भीषण अवस्था असताना स्वार्थी आमदारांनी एकत्र येत वेतनवाढ करून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. ही लांच्छनास्पद बाब असून, येत्या आठ दिवसांच्या आत बागलाणच्या आमदारांनी वेतनवाढ नाकारण्याचे जाहीर न केल्यास त्यांच्या घरासमोर वकील संघ ठिय्या आंदोलन छेडेल, असा इशारा आज वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांनी दिला.मंत्री व आमदारांच्या घसघशीत वेतनवाढीच्या निषेधार्थ व बागलाणच्या आमदारांनी वेतनवाढ नाकारावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १२) सटाणा वकील संघाच्या वतीने शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. चावडीमार्गे सोनारगल्ली, टिळक रोड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन अॅड. भदाणे यांनी राज्यकर्त्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. आमदार बच्चू कडू, डॉ.सुधीर तांबे, श्रीधर देशपांडे यांनी वेतनवाढ नाकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून राज्यातील अन्य आमदारांच्या स्वार्थाचे ओंगळवाणे दर्शन समाजाला घडले असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकीकडे शिक्षकांना अल्पवेतनावर काम करावे लागत आहे. अॅड. मधुकर सावंत, नाना भामरे, वसंतराव सोनवणे यांचीही भाषणे झाली. यावेळी नायब तहसीलदार डी.के. धिवरे यांना वकील संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात अॅड. सतीश चिंधडे, अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, सुजाता पाठक, मनीषा ठाकूर, किरण देवरे, स्मिता चिंधडे, सी.एन.पवार, प्रशांत भामरे, प्रकाश गोसावी, सोमदत्त मुंजवाडकर, संजय अहिरे, संजय सोनवणे, यशवंत सोनवणे, नीलेश डांगरे, विष्णू सोनवणे, आर.एम. जाधव, के.पी. भदाणे, के.टी.ठाकर, श्याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी महेंद्र शर्मा सहभागी झाले होते. (वार्ताहर)
आमदारांच्या पगारवाढीच्या निषेधार्थ वकिलांचा मोर्चा
By admin | Updated: August 12, 2016 22:35 IST