पंचवटी : राज्यात परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी पूर्णपणे दुष्काळ संपलेला नाही. समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील एक गाव दत्तक घेण्यासाठी मखमलाबादचे शेकडो ग्रामस्थ एकवटले आहेत. मखमलाबाद ग्रामस्थ, विविध संस्था तसेच नगरसेवक दामोदर मानकर यांच्या कीर्तनाच्या उपक्रमातून मिळालेले मानधन दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले जाणार आहे. स्व. डॉ. वसंत पवार यांचे पुण्यस्मरण व स्व. नारायणबाबा मानकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने येत्या बुधवारी मखमलाबाद हायस्कूलच्या पटांगणावर या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे. मानकर हे देशभक्तिपर व सध्याच्या परिस्थितीवर तरुणांना प्रबोधन होईल, असे राष्ट्रीय कीर्तन गावोगावी करून त्यातून मिळालेले मानधन हे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जाणार आहे. स्व. मानकरबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मानकर परिवाराकडून दुष्काळग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा निधी देऊन त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. या शिवाय १२ डिसेंबरला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जन्मतिथी साजरी करून त्यातून मिळालेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी निवडलेल्या गावी जाऊन देणार आहे. याशिवाय दत्तक गावातील तरुण मुला-मुलींचा एकत्र विवाह सोहळा करणार असून, इच्छुक नागरिकांनी वाटेल त्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन मानकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (वार्ताहर)
कीर्तन उपक्रमातून दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेणार
By admin | Updated: October 5, 2015 23:08 IST