नाशिक : गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व मुदत संपलेल्या राज्यातील शंभर कृषी उत्पन्न बाजार समित्या तडकाफडकी बरखास्त करण्याचा आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश केला होता. आता त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागाला तब्बल पाच दिवस लागले. नाशिक जिल्ह्णातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी काढले आहेत.विशेष म्हणजे लोकमतनेच यासंदर्भात १२ नोव्हेंबरच्या अंकात ‘बाजार समित्यांची बरखास्ती राहिली कागदावरच’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सहकार खात्याला काहीशी खडबडून जाग आली. बरखास्त केलेल्या मात्र प्रशासक नियुक्त्यांची कारवाई रखडलेल्या जिल्ह्णातील सात कृषी बाजार समित्यांवर जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी प्रशासक नियुक्त्यांची तातडीने कारवाई केली. आघाडी सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मुदत संपल्यानंतर मुदतवाढ दिली होती.मात्र भाजपाचे सरकार आल्यावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुदत संपलेल्या व गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राज्यातील शंभर कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याची घोषणा पाच दिवसांपूर्वी केली होती. मात्र घोषणा होऊनही त्याचे प्रत्यक्ष आदेश जिल्हा पातळीवर पोहोचण्यासाठी पाच दिवस उलटले होते. त्याबाबत लोकमतने सहकार विभागाच्या एकूणच चालढकल सुरू असलेल्या कारभारावर वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत सहकार विभागाने ही प्रशासक नियुक्तीची कारवाई केली आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सात बाजार समित्यांवर प्रशासक
By admin | Updated: November 12, 2014 23:36 IST