नाशिक : शनिवारी सायंकाळी धुवाधार पावसाने शहर परिसराला झोडपल्याने आता प्रशासनाच्या उरात धडकी भरली असून, रविवारी (दि. १३) दुसऱ्या शाही पर्वणीलाही पावसाचा जोर कायम राहिल्यास पोलिसांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. पावसामुळे रामकुंडासह गोदाघाट जलमय होऊन स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ थांबून राहण्याची भीती पोलिसांना सतावत आहे.रविवारच्या दुसऱ्या शाही पर्वणीचे पोलिसांचे नियोजन पूर्ण झाले असून, शनिवारी दुपारपर्यंत पिठोरी अमावास्येचा योग साधत हजारो भाविकांनी रामकुंडात स्नान केले खरे; मात्र दुपारी साडेतीन वाजेनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून येऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास धुवाधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपूनच काढले. पावसाचा जोर एवढा होता की, काही अंतरावरील समोरचे दृश्यही दृष्टीस पडत नव्हते. दरम्यान, या तासाभरात झालेल्या पावसामुळे गोदाघाट जलमय होऊन गांधी तलाव, यशवंतराव महाराज पटांगणावरून पाणी वाहू लागले. ड्रेनेजही ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणीही थेट रामकुंडात गेले. रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पाणी साचल्याने भाविकांची तारांबळ उडाली. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजेपासून भाविकांना रामकुंडातील स्नानासाठी मज्जाव केला. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे रामकुंडात स्नान करणे धोक्याचे असल्याने भाविकांचा ओघ रोखून ठेवण्यात आला. भाविकांनी नदीपात्रात जाऊ नये, अशा सूचना गोदाघाटावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वारंवार दिल्या जात होत्या. पुढचे सुमारे दोन तास भाविकांचे स्नान बंद राहिले. या काळात हजारो भाविक खोळंबून राहिले. दरम्यान, रविवारी शाही पर्वणीला पावसाचा असाच जोर राहिल्यास रामकुंडाच्या जलपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे भाविकांना स्नानापासून थांबवून ठेवण्याची वेळ येऊ शकते. तसे झाल्यास देशभरातून स्नानासाठी दाखल होणाऱ्या भाविकांचा जथ्था थांबून राहून नंतर पाणी ओसरल्यावर एकाच वेळी गर्दी होण्याचीही शक्यता आहे. भाविकांच्या या गर्दीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. गोदाघाट जलमय झाल्याने भाविकांना तेथून वाटचाल करणेही अवघड झाल्याचा अनुभव शनिवारी आला. अशीच परिस्थिती रविवारीही कायम राहिल्यास पोलिसांवर बंदोबस्तासह भाविकांची वाटचाल सुकर करून देण्याचीही जबाबदारी निभवावी लागणार आहे. त्यामुळे रविवारचा दिवस तरी पावसाने विश्रांती घ्यावी, अशीच पोलिसांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
पावसामुळे प्रशासनाला धडकी
By admin | Updated: September 12, 2015 23:43 IST