नाशिक : देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बांधवांच्या नृत्य, नाट्य, संगीत व हस्तकलेचा जागर करणाऱ्या आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे. शहरात शुक्रवारपासून (दि. २९) तीन दिवस हा राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव रंगणार असून, यानिमित्त सोळा राज्यांतील चारशेहून अधिक कलावंतांचा कलाविष्कार पाहण्याची पर्वणी नाशिककरांना लाभणार आहे.राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) नवी दिल्ली आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जुलै या कालावधीत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांचा कलाविष्कार एकाच रंगमंचावर अनुभवण्याची संधी नाशिककरांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी ७ वाजता प्रख्यात अभिनेत्री हिमानी शिवपुरी, एनएसडीचे संचालक वामन केंद्रे, महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सदर महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. देशभरातील १६ राज्यांमधील ४०४ आदिवासी कलावंत सहभागी होऊन कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यांत आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, त्रिपुरा, मणिपूर, आदि राज्यांतील आदिवासी कलावंतांचा समावेश आहे. महोत्सवात ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य व नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावर दोन दिवस परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आदिवासींच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन तीन दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार असून, त्यात विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तीनही दिवस आदिवासी कला व कलाप्रकारांचा परिचय करून दिला जाणार आहे.
आदिरंगची आजपासून पर्वणी
By admin | Updated: July 29, 2016 00:18 IST