नांदगाव : जनमाहिती अधिकारी तथा अव्वल पुरवठा कारकून व्ही. डी. थोरात यांनी माहितीच्या अधिकारात लक्ष्मण बोगीर, हिसवळ बु. यांनी मागितलेली माहिती मुदतीत दिली नाही म्हणून राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक पी. डब्ल्यू. पाटील यांनी थोरात यांना पाच हजार रुपये शास्ती (दंडात्मक कारवाई) केली आहे.लक्ष्मण बोगीर यांनी हिसवळ बु. येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकांविषयी सविस्तर माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. अर्ज दि. ४ डिसेंबर २०१२ रोजी करण्यात आला होता.३० दिवसांच्या मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून बोगीर यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले. आयोगाने दि. २१.१०.२०१४ रोजी १५ दिवसांच्या आत थोरात यांनी समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर सात महिने उलटून गेले तरीही थोरात यांनी आयोगाकडे कोणताही खुलासा केला नाही म्हणून आयोगाने दि. ३०.६.२०१५ रोजी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करण्याबाबत कळविले. तरीही थोरात आयोगासमोर आले नाहीत म्हणून आयोगाने त्यांच्याविरुद्ध पाच हजार रुपये शास्तीची कारवाई केली असून, तरीसुद्धा थोरात यांनी शासकीय कोषाागारात रक्कम भरली नाही. प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी जुलै २०१५ पासून दोन समान हप्त्यात थोरात यांच्या वेतनातून वसूली करण्याची कार्यवाही करावी, असे यासंबंधी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)
मुदतीत माहिती न देणाऱ्या कारकुनावर कारवाई
By admin | Updated: July 19, 2015 22:37 IST