वीज चोरी पकडण्यासाठी महावितरण कंपनीने विभागीय व मंडल स्तरावर भरारी पथके तयार केली असून, सटाणा शहरासह व्यावसायिक व घरगुती वापरासाठी होत असलेल्या चोरीच्या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे . आतापर्यंत चाळीस ठिकाणी भरारी पथकाने धाडी टाकल्या असून, वीज चोरीसाठी छेडछाड केलेले सुमारे बावीस वीज मीटर जप्त करण्यात आले आहेत. काही व्यावसायिक ठिकाणीदेखील अनधिकृत वीज जोडून वीज चोरी पकडली असून, केबल जप्त करण्यात आल्या आहेत. या धाड सत्रात दहा लाख रुपयांहून अधिक वीजचोरी पकडण्यात आली आहे .
सदोष मीटर या धाड सत्रात बहुतांश घरगुती विजेचे मीटर जप्त करण्यात आले असून, ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दंड आकारणी केल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ग्राहकांच्या तक्रारीनुसार कमी प्रमाणात वीज वापरूनही अथवा कोविड काळात तीन तीन महिने घर बंद असूनही सदोष मीटरमुळे ग्राहकांची लूट केली जात असल्याची ग्राहकांची ओरड आहे.