नाशिक : जिल्ह्णातील सर्व प्रकल्पातील अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामांचा आढावा घेण्यात आला. त्यात अंगणवाडी इमारतींचे बांधकामे अपूर्ण ठेवणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करावा, असे आदेश महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश डोखळे यांनी दिले.शुक्रवार (दि.९) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत सर्व प्रकल्पातील अंगणवाडीसेविका-मदतनीस रिक्त जागा भरण्याबाबत माहिती घेण्यात आलेली असून, चांदवड व देवळा तालुक्यातील भरतीबाबत १४ सप्टेंबर २०१५ रोजी जाहिरात दिलेली असून, भरतीप्रक्रिया सुरू आहे. तसेच उर्वरित या प्रकल्पांची जाहिरात आॅक्टोबरअखेर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीने बैठकीत त्यांच्या विभागाचा अहवाल देताना बालकांचे लसीकरणकामांची प्रगती ९० टक्केझालेले आहे. तसेच ७ ते १३ आॅक्टोबर २०१५ कालावधीत इंद्रधनुष्य अभियानांतर्गत दोन वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण झालेले नाही, अथवा राहून गेलेल्या बालकांची लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र नागरी प्रकल्पांकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभाग आयुक्तांना सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेतून पूर्ण झालेल्या कामांची (अंगणवाडी इमारती, प्रशिक्षणे) यांची उद््घाटने ही महिला बालकल्याण सभापती अथवा समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात यावी. त्या कार्यक्रमास गटातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बैठकीस सदस्य कलावती चव्हाण, सुरेखा जिरे, शीला गवारे, सुरेखा गोधडे, सीमा बस्ते, सोनाली पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बांधकामे अपूर्ण ठेवणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई
By admin | Updated: October 9, 2015 23:21 IST