सरकारी प्रशिक्षण घेणे अनिवार्यनाशिक : पुणे येथील यशदा या सरकारी प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांनी प्रशिक्षणास उपस्थित न राहता दांडी मारल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. सरकारी प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर या प्रशिक्षणासाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना त्या त्या विभागांच्या प्रमुखांनी पाठविणे व त्यांची नावे कळविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र तरीही प्रशिक्षणासाठी जाण्यास काही अधिकारी/कर्मचारी इच्छुक नसल्याचे तसेच काही कार्यालय/विभागप्रमुख/कर्मचारी यांना कार्यमुक्त करीत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांनी प्रशिक्षणासाठी सक्तीने उपस्थित राहणे गरजेचे आहे. प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांना संबंधित विभागप्रमुख यांनी कार्यमुक्त करणे सक्तीचे राहील. प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांना काही अतिमहत्त्वाच्या कारणास्तव प्रशिक्षणास उपस्थित राहणे शक्य नसेल, तर त्याऐवजी पर्यायी अधिकार्यांची नावे देणे संबंधित विभागांना सक्तीचे राहील. यापुढे दरवर्षी वेतनवाढ देताना अधिकारी व कर्मचार्यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले किंवा कसे याची पडताळणी करणे आवश्यक राहील. तसेच सर्व मंत्रालयीन विभागांनी प्रस्तुत परिपत्रक त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे परिपत्रकात प्रधान सचिव डॉ. भगवान सहाय यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)
दांडी बहाद्दरांवर होणार कारवाई
By admin | Updated: May 29, 2014 00:17 IST