चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगाव-मनमाड रोडवर लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जळगाव-पुणे ही खासगी लक्झरी बस (क्र. एमएच १८ एपी ८००१) रात्री १२ वाजेच्या सुमारास मनमाडकडे येणाऱ्या बसने मालेगावकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १५ ईसी ८३१२) धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी बसच्या खाली घुसल्याने दुचाकीने पेट घेतल्याने बसही पेटली. हा सर्व प्रकार बघून बसमधील प्रवासी तातडीने खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यात मोटारसायकलवरील दोन्ही तरुण आगीत ठार झाले. मनमाड अग्निशमन दलाने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. घटनेचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस कर्मचारी शिवाजीराव कुशारे, नरेश सैंदाणे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव कुशारे करीत आहेत. (वार्ताहर)
अपघाताने लक्झरी बसला आग, दोघे ठार
By admin | Updated: February 28, 2017 01:06 IST