निफाड : रविवारी सकाळी निफाडकडे येणारी ट्रक जळगाव फाटा येथे गतिरोधक लक्षात न आल्याने अचानक ब्रेक दाबून थांबली; मात्र या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची जबर धडक बसली. त्यात मागील ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला. त्यास जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकमध्ये दोन्ही पाय अडकून जखमी झालेल्या चालकाला यावेळी नागरिकांनी बाहेर काढण्यासाठी दीड तास प्रयत्न केले. बलराम फुलचंद उपाध्ये (वय ४०), रा. जबलपूर, मध्य प्रदेश हा मसूरडाळीच्या गोण्या घेऊन सकाळी पावणेसहाच्या सुमारास नाशिककडून निफाडकडे नाशिक- औरंगाबाद रस्त्याने येत होता. निफाडनजीक जळगाव फाटा येथे बीएसएनएलच्या कार्यालयासमोर गतिरोधकाच्या ठिकाणी पुढच्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर पुढचा ट्रकचालक पसार झाला. मात्र मागील ट्रकचा भाग दाबला गेल्याने त्यातील चालक बलराम उपाध्ये यांचे दोन्ही पाय अडकले. दरम्यान, जळगाव फाट्याजवळचे नागरिक व गॅरेज काम करणाऱ्या कारागिरांनी गॅस कटर आणि स्टाईल कापण्याच्या मशीनने ट्रकच्या एका बाजूचा पत्रा कापून चालकाला दीड तासानंतर बाहेर काढण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार एम. के. पठाडे करीत आहेत. सदर घटनेनतंर अवघ्या काही मिनिटांत निफाड उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहचली होती. (वार्ताहर)
जळगाव फाट्यानजीक गतिरोधकामुळे अपघात
By admin | Updated: October 4, 2015 22:12 IST