नाशिक : नाशिकरोड विभागातील मनसेच्या दोघा नगरसेवकांना अपात्र ठरविल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली असून, शुक्रवार (दि.१ जुलै)पासून महापालिकेला मतदारयादीचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. त्यातच, शिवसेनेने वाऱ्यावर सोडल्यानंतर न्यायालयाकडून ३० जुलैच्या आत स्थगिती आदेश मिळविण्यासाठी दोन्ही अपात्र नगरसेवकांची धावाधाव सुरू झाली आहे. मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी महापालिकेला सारी यंत्रणा उभी करावी लागणार असल्याने मध्येच स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास यंत्रणेवरील खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनही पेचात सापडले आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्हिप बजावूनसुद्धा पक्षविरोधी मतदान करणारे नाशिकरोड विभागातील मनसेचे नगरसेवक नीलेश तुकाराम शेलार आणि शोभना संजय शिंदे यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरविल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) मधील सदस्यपदासाठी पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले असून, मतदारयादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. नीलेश शेलार व शोभना शिंदे यांचे सदस्यपद रद्दबातल ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निकाल विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दि. २९ मार्च रोजी दिला होता. त्यानंतर, शिवसेनेने सदर सदस्यांच्या पाठीशी उभे असल्याचा दावा करत दि. ४ एप्रिल २०१६ रोजी उच्च न्यायालयात विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप सदर याचिका न्यायमूर्तींपुढे सुनावणीसाठी येऊ शकलेली नाही. त्यातच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. पोटनिवडणूक आॅगस्ट २०१६ मध्ये घेण्यात येणार असून, त्यासाठी मतदारयादी करण्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. १ जुलैपासून सुरू होणार आहे. १६ जुलै २०१६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. अंतिम मतदारयादी ३० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पोटनिवडणुकीबाबत महापालिका पेचात
By admin | Updated: July 1, 2016 00:18 IST