नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्व इच्छुकांनी दाखल केलेल्या १७२ नामनिर्देशन पत्रांपैकी केवळ ९० अर्ज वैध ठरले आहेत. बहुतांश इच्छुकांनी एकाच प्रभागातून एकाच जागेवर एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काही अर्ज इच्छुकांनी परत घेतले, तर एकाच प्रभागात विविध जागांवरून दाखल झालेल्या एकापेक्षा अधिक अर्जांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी पसंती मागवून उर्वरित अर्ज अवैध ठरवले. प्रभाग २४ मध्ये छाननी प्रक्रिया सुरू असताना नीलेश तिदमे यांनी विजय सानप यांच्या नामनिर्देशन पत्रातील प्रतिज्ञा पत्रावर आक्षेप घेतला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिदमे यांना अर्ज तपासण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्यांची तक्रारही लेखी स्वरूपात घेण्यात आली. परंतु निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिदमे यांची हरकत फेटाळून सानप यांचा अर्ज वैध ठरवला. या प्रकाराव्यतिरिक्त प्रभाग २४ सह १२ व ७ ची छाननी प्रक्रियेत कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात आक्षेप घेतला नाही. त्यामुळे दुपारी २ वाजताच्या सुमारास छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे घोषितकरण्यात आले. छाननी प्रक्रियेसाठी उपस्थित नसलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पसंती अर्ज भरून दिले, तर ज्या उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते त्यांचा प्रथम दाखल झालेला अर्ज कायमकरीत अन्य अर्ज अवैध ठरविण्यात आले. शनिवारी सकाळी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक ७ मधील अ, ब, क व ड या चारही जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली, तर प्रभाग १२ च्या छाननी प्रक्रियेत गैरसमजातून झालेल्या प्रकारामुळे सुरेश पाटील यांनी एकाच प्रभागातून दोन अर्ज वैध करण्याची मागणी केली. अखेर समजुतीने या प्रकरणात निर्णय झाला. (प्रतिनिधी)
९० अर्ज वैध : सानप यांच्या अर्जावर तिदमेंचा आक्षेप
By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST