पंचवटी : शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत यापुढे व्यापाऱ्यांकडूनच वसूल करावी, अशी भूमिका कायम ठेवल्याने शासनाच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने थेट परवाने रद्द करण्याचा दणका दिला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने लिलावात सहभाग न घेणाऱ्या ७९७ आडते व व्यापाऱ्यांना लेखी नोटिसा बजावून तत्काळ लिलावात सहभाग घ्यावा, असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे नोटिसा मिळाल्यानंतर चोवीस तासांच्या आत दखल न घेणाऱ्या व्यापारी व आडत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व त्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जे व्यापारी जागेवर होते त्यांना तत्काळ, तर जे दुकानात नव्हते त्यांच्या दुकानांवर नोटिसा लावण्यात आल्याची माहिती बाजार समतिीचे सचिव अरुण काळे यांनी दिली आहे. व्यापाऱ्यांकडून आडत वसूल केल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भूमिका घेत गेल्या चार दिवसांपासून खरेदी-विक्र ी बेमुदत बंद करून लिलावात सहभागी होण्याचे टाळले आहे. सध्या बाजार समितीत शेतकऱ्यांकडून बाजार समितीत मंगळवारी २०३ वाहने भरून जवळपास ८३८ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यात कारली, कोबी, फ्लॉवर, टमाटा, काकडी, वांगी यांसह अन्य फळभाज्यांचा समावेश होता. (वार्ताहर)
७९७ आडते, व्यापाऱ्यांना नोटिसा
By admin | Updated: July 13, 2016 00:37 IST