नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, नाशिकमधून काश्मीर येथे पर्यटनासाठी सुमारे ९० नागरिक फिरायला गेले होते. त्यापैकी ६१ नागरिक अजूनही काश्मीर येथेच असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
जिल्हा प्रशासन या पर्यटकांवर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधून जवळपास ९० पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. यातील एक महिला किरकोळ जखमी झाली असून, सर्व पर्यटक सुखरूप आहेत. जखमी महिलेसह काही पर्यटक नागपूरला येण्यासाठी निघाले आहेत. इतर पर्यटकांवरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून ८० ट्रॅव्हल एजन्सीशी नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधण्यात आला. त्यात ५० पर्यटक टॅव्हल्स कंपन्यांसोबत गेल्याची प्राथमिक माहिती आहे, तर ११ पर्यटक स्वतंत्ररीत्या गेले आहेत. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आहे. जिल्ह्यातील एकूण ६१ पर्यटक सध्या जम्मू काश्मीर येथे असल्याची माहिती आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.
हेल्प लाईन नंबर:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक०२५३ : २३१७१५१ (नाशिक जिल्ह्याकरिता)श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक : ०१९४ : २४८३६५१/२४५७५४३