मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर

By धनंजय रिसोडकर | Published: March 6, 2024 02:45 PM2024-03-06T14:45:37+5:302024-03-06T14:45:51+5:30

जिल्ह्यात अनेक शाळांचे वीज देयक थकल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांच्या जोडण्या तोडल्या आहेत.

6 crore sanctioned for solar power project at Zodget near Malegavan | मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर

मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर

नाशिक : जिल्हा नियोजन समितीने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ५ कोटी ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आराखडा सादर करून तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून एक मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी रत्नागिरीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही सरकारी कार्यालयांचे वीजदेयक शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा नोव्हेंबरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. त्यानुसारच या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये यासह प्राथमिक आरोग्य केंद्र आदींच्या वीज देयकाचा प्रश्न गंभीर आहे.

जिल्ह्यात अनेक शाळांचे वीज देयक थकल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांच्या जोडण्या तोडल्या आहेत. तशीच परिस्थिती अनेक ग्रामपंचायतींचीही आहे. सरकारी आस्थापनांची वीज देयके हा कायम संबंधित कार्यालयप्रमुख व लोकप्रतिनिधी यांच्या डोकेदुखीचा विषय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी कार्यालये, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायत कार्यालये यांचा वीज देयकाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या मदतीने झोडगे येथे ८ हेक्टर सरकारी जागेवर हा एक मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Web Title: 6 crore sanctioned for solar power project at Zodget near Malegavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.