गेल्या सोमवारी श्रावण मासाला प्रारंभ झाला असून, कैलास मठात दैनंदिन महारुद्राभिषेकपूजन कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. संपूर्ण महिनाभर आचार्य संविदानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत दैनंदिन सायंकाळी सहा ते साडेआठ वेळेत नर्मदेश्वर महारुद्राभिषेकपूजन, महाआरती, भजन, कीर्तन कार्यक्रम होत आहे. श्रावण महिन्यात भगवान महादेवाची पूजा व उपासना केल्याने मन:शांती लाभते व फलप्राप्ती होते. जीवन सुखदायी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय कोरोना संसर्ग नष्ट होऊन सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, भारत देशात समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी व शांतता नांदावी, हरितक्रांती घडावी, देश सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी श्रावण महिन्यात नर्मदेश्वर महारुद्राभिषेकपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास मठातर्फे संपूर्ण महिनाभर चालणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पाडले जात आहेत, असे कैलास मठाचे प्रमुख आचार्य स्वामी संविदानंद सरस्वती यांनी सांगितले. श्रावण मासानिमित्त कैलास मठात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन फुलांची सजावट केली आहे. कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेऊन खबरदारी म्हणून मंदिरात भाविकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी गावात, रुग्णालयात, वृद्धाश्रम, आधाराश्रम याठिकाणी दररोज फळांचा प्रसाद वाटप केला जात आहे.
श्रावणमासानिमित्त ५,१०० नर्मदेश्वर महारुद्राभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST