नााशिक: मागील आठवड्यात दोनदा लस प्राप्त झाल्यानंतर या आठवड्यात जिल्ह्यासाठी सुमारे ४२ हजार कोविशिल्ड लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पंधरा तालुके आणि दोन महापालिकांना या लसींचे वितरण करण्यात आले असून मंगळवारी केंद्रांवर नागरिकांना डोस उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी शहरातील केंद्रांना लसीचा पुरवठा केला जात आहे. मागणी केल्याप्रमाणे जसजसे लसींचे डोस प्राप्त होतील तसतसे लागलीच ते केंद्रांवर रवाना केले जात आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी लसींचे नियोजन केले जात आहे. ३० ते ५० हजारांच्या पुढे लस उपलब्ध झाल्यास केंद्रांवर दोन्ही डोस दिले जात आहेत. लसीची संख्या कमी असल्यास शक्यतो दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी दोन्ही डोसचे प्रमाण राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
गेल्या शनिवारी २४ हजार कोविशिल्ड आणि ११ हजार ८४० कोव्हॅक्सिन लसींचे डोस प्राप्त झाले होते. तत्पूर्वी गेल्या बुधवारी देखील सुमारे ३० हजार लसींचे डोस जिल्ह्यासाठी प्राप्त झाले होते. या लसींचे तालुकानिहाय तसेच महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार वाटप करण्यात आलेले आहे. मंगळवारी (दि. २६) कोविशिल्ड लस प्राप्त झाल्याने केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या लसीकरणाबाबतच्या देखील तक्रारी आता होऊ लागल्या आहेत. त्या ठिकाणी रांगा लागत आहेत. शिवाय नियमांचे पालन होत नसल्याचेही बोलले जात आहे. व्हॅक्सिन कोणती दिली जात आहे याची माहिती नागरिकांना दिली जात नाही. पैसे भरूनही नागरिकांचे समाधान होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
--कोट--
सध्या लसीकरणासाठी सर्व स्तरातील नागरिकांमध्ये अतिशय चांगला उत्साह आहे. लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे स्थानिक स्तरावरील सर्व आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उपलब्ध लसीप्रमाणे लसीकरण करवून घेतले जात आहे. लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी, तथा नाशिक जिल्हा कोविड लसीकरण समन्वयक