येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या गावांमध्ये महालगाव (गोल्हेवाडी) व परिसरातील वाड्या- वस्त्यांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिता केशव महाले व अमोल रामनाथ येवले यांनी निवेदनाद्वारे आमदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.सध्या नगरसूल गावात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेचे विस्तारीकरण करून योजनेत अजून १७ गावे जोडली जाणार आहे. परंतु गावात गोल्हेवाडी गावाचा समावेश नाही. गोल्हेवाडी येथे जिल्हा परिषद अंतर्गत शासन निधीतून विहीर खोदून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या विहिरीने तळ गाठल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण थोडाफार पाऊस झाला की हे टॅँकर बंद केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागातील लोकसंख्या सुमारे ११०० इतकी आहे. त्यामुळे या गावांचा ३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समवेश झाला तर परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.२ रोजी झालेल्या ग्रामसभेत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून, पाणीपुरवठा योजनेत महालगाव (गोल्हेवाडी), बहादुरे वस्ती, बारे वस्तीचा समावेश करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे शिफारस करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच प्रसाद पाटील यांनीदेखील अशा आशयाच्या मागणीचे पत्र दिले आहे. (वार्ताहर)
३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेशाची मागणी
By admin | Updated: October 6, 2015 22:28 IST