नाशिक - मतदार याद्यांमधील घोळ सर्वश्रुत आहे. त्यासाठीच पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी मनसेने मतदार याद्यांचे सर्वेक्षण हाती घेतले असून त्याची सुरूवात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून केली असता, ३ लाख ४४ हजार पैकी १ लाख २८ हजार म्हणजेच ३५ टक्के मतदारांची नावे दुबार आढळून आली आहेत. मनसेचे प्रदेश सचिव प्रमोद पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी पत्रकारपरिषदेत या धक्कादायक नोंदींची माहिती देत निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले.मनसेने राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे सर्वेक्षण हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, ढिकले यांनी त्याची सुरूवात स्वत:च्याच नाशिक पूर्व मतदारसंघातून केली. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत धक्कादायक नोंदी आढळून आल्या. याबाबतची माहिती देताना प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी सांगितले, पूर्व विधानसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ५८७ मतदारांची नावे ही जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही आढळून आलेली आहेत. नामसाधर्म्य सोडले तर असंख्य नावे ही पूर्ण नावासहित सारखी आहेत. याशिवाय, पूर्व मतदारसंघात १६ हजार ३०० नावे दुबार आढळून आलेली आहेत. म्हणजेच एकूण ३५ टक्के नावे दुबार आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे दि. १३ डिसेंबर २०१७ रोजी लेखी तक्रार अर्ज दिला परंतु, दि. १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन प्रारुप मतदार यादीत कुठल्याही प्रकारची दुरूस्ती अथवा सुधारणा करण्यात आलेली नाही. इतर मतदारसंघातील नावे पूर्व मतदारसंघात आलेली आहे. त्यापैकी काही नावांचे परीक्षण केले असता अशा व्यक्ती प्रत्यक्षात तपासणीत आढळून आलेल्या नाहीत. सदर व्यक्तींच्या नोंदणीबाबत पुरावे मागितले असता पुरावे अभिलेखात उपलब्ध नसल्याचे उत्तर निवडणूक विभागाकडून देण्यात आले. याशिवाय, निवडणूक विभागाने महापालिकेकडे बोट दाखवत सदर नावे वगळण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वास्तविक मनपाला मतदार नोंदणी करण्याचे कोणतेही संविधानिक अधिकार नाहीत. मनपाची यादी ही विधानसभा मतदार यादीवरच आधारित असते. मतदार यादीतील हा सारा घोळ संदेह निर्माण करणारा असून चौकशी होण्याची मागणीही पाटील व ढिकले यांनी केली आहे. यावेळी शहराध्यक्ष अनिल मटाले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम उपस्थित होते.सोमवारी सुनावणीमनसेने तक्रार केल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाºयांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पूर्व विधानसभा मतदारसंघातील तक्रारीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे येत्या सोमवारी दि. २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या प्रकरणात निवडणूक विभागाने तातडीने योग्य कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी सांगितले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आढळली ३५ टक्के नावे दुबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:27 IST
मतदार यादीतील घोळ : मनसेची शोधमोहीम, निवडणूक आयोगाकडे तक्रार
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आढळली ३५ टक्के नावे दुबार
ठळक मुद्देपूर्व विधानसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ५८७ मतदारांची नावे ही जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही आढळून आलेली आहेत काही नावांचे परीक्षण केले असता अशा व्यक्ती प्रत्यक्षात तपासणीत आढळून आलेल्या नाहीत