नाशिक : तिसरी लाट ऑगस्ट वा सप्टेंबरदरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सज्जतेसाठी जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी ५० खाटांच्या स्वतंत्र कक्ष उभारणीव्दारे सज्जता करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५० आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बालकांसाठी स्वतंत्र ५० खाटा याप्रमाणे ३०० खाटांची सर्व उपकरणांसह सज्जता करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच तिसऱ्या मजल्यावर या ५० खाटांच्या कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या कक्षात भिंतींवर आकर्षक कार्टुन आणि बालकांची चित्रे काढून कक्ष सजविण्यात आला आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजन लाईनची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. आठवडाभरात या कक्षात आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर्ससह अन्य मशिनरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर हा कक्ष जिल्ह्यातील संभावित तिसऱ्या लाटेसाठी सज्ज करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेत दहा वर्षांवरील मुले अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सज्जता करण्यात येत आहे. त्याशिवाय महानगर पालिकेच्या वतीनेदेखील शहरात १०० खाटांची दोन रुग्णालये केवळ बालके आणि त्यांच्या मातांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत. त्या सर्व बेडची पूर्तता आणि तिथेदेखील ऑक्सिजनलाईनची सज्जता ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या लाटेवेळी झालेली ऑक्सिजन अपूर्ततेची उणीव निदान तिसऱ्या लाटेत जाणवणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो
शहरात खासगीमध्ये ६०० बेड
शहरातील खासगी स्वरुपाच्या ४१ बाल रुग्णालयांमध्ये एकूण ६००हून अधिक बेडची पूर्तता ठेवण्यात आली आहे. त्यात ४००हून अधिक ऑक्सिजन बेड, २५ व्हेंटिलेटर बेड आणि अन्य बेडची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये मिळून आवश्यकता भासल्यास केवळ बालकांसाठी किमान एक हजारहून अधिक बेड उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास मोठ्या व्यक्तींच्या रुग्णालयांतही किमान हजारहून अधिक बेड उपलब्ध होऊ शकणार आहेत.
इन्फो
बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स सज्ज
तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत चालला आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीदेखील पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेषकरून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठीत करण्यात आला आहे. तसेच जिल्हा स्तरावरील टास्क फोर्सदेखील गठीत करण्यात आलेला असून, हा टास्क फोर्सदेखील सज्ज ठेवण्यात आला आहे.
कोट
सर्व रुग्णालयांमध्ये सज्जता
जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, सर्व बालरोग तज्ज्ञांशीदेखील समन्वय साधला जात आहे.
डॉ. किशोर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
------------------------
फोटो (प्रशांत खरोटे फोटो टाकणार आहेत. ) (बातमी पान २ साठी मेन लीड)
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत बालकांसाठी उभारण्यात आलेला बाल रुग्णांसाठीचा आकर्षक सजावट केलेला कक्ष. (छाया : प्रशांत खरोटे)