नाशिक : कोरोनामुळे मंदीच्या चक्रात रुतू पाहणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने बांधाकाम क्षेत्रातील खेरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्याील सात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली आहे. व्यवहार पूर्ण झालेले ग्राहक कागदपत्रांची पूर्तता आणि वेगवेगळ्या तांत्रिक कारणांनी दस्त नोंदणी करू शकत नसल्याने, त्यांनी आता मुद्रांक शुल्क भरून उर्वरित प्रक्रिया पुढील १२० दिवसांत पूर्ण करून तीन टक्के सवलत मिळविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला अवघे तीन दिवस उरले आहे. त्यामुळे नाेंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र, आता याच महिन्यात, म्हणजे ३१ डिसेंबरपूर्वी नाेंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करीत सध्या सुरू असलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार असल्याने, अनेक ग्राहकांचा मुद्रांक शुल्क भरण्याकडे कल दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा अधिकाधिक ग्राहकांना मिळावा, यासाठी काही उपनिबंधक कार्यालये रात्री ८ पर्यंत सुरू ठेवली जात आहे.
इन्फो-
घरखरेदीला चालना
सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घरखरेदीला चालना मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिमाहीमध्ये ३७ हजार ४२२ दस्त नोंदणीच्या माध्यमातून शासनाला १७७ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे, डिसेंबरच्या पूर्वार्धात १५ डिसेंबरपर्यंत ४ हजार ४७५ दस्त नोंदणीच्या २९ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल संकलित झाला आहे. या मुद्रांक शुल्कातील तीन टक्के सवलचीचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत घेता येणार असून, त्यानंतर १ टक्का सवलत कमी केली जाणार असून, ग्राहकांना ४ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.