नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २१ फेब्रुवारीला होत असून, जिल्हाभरात एकूण २६५३ मतदान केंद्रे त्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या मतदानासाठी जवळपास १७ हजार २०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्यासाठी ८६५ वाहने आरक्षित करण्यात आली आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एस.टी. बसेससह एकूण ८६५ वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. मतदानाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया एक-दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्हा परिषदेला २१ फेब्रुवारीला मतदान होत असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. २१ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने मतदान कर्मचारी २० फेब्रुवारीलाच नेमलेल्या मतदान केंद्रावर पोहोचवणे आवश्यक आहे. मतदान यंत्रासह सर्वच बाबींसाठी शासकीय आणि वाहने आरक्षित केली आहेत. राज्यात महापालिका व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात नाशिकसह प्रमुख दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषद तसेच १८३ पंचायत समित्या अशी मोठी संख्या आहे. एकाच दिवशी या निवडणुका होत असल्याने निवडणूक कामासाठी वाहनांची गरज आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस मदतीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकसाठी नाशिक, जळगाव व अहमदनगर येथील ८६० बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयासाठी २६५३ मतदान केंद्रे
By admin | Updated: February 17, 2017 00:39 IST