नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, चालू महिन्यात आत्तापर्यंत २६ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून डास निर्मूलन आणि अन्य उपाययोजना केल्या जात असताना ही वाढ झाली आहे. यंदा पावसाळ्याच्या आधीच शहरात डेंग्यूचे आगमन झाले. अशोका मार्ग आणि पंचवटीत काही भागात सुमारे डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले. त्यानंतर नाशिकरोड येथे ओमकारनगरातही चार जणांना डेंग्यू झाला होता. गेल्या आठवड्यापर्यंत पालिकेने केलेल्या रक्तनमुने तपासणीत १४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु आठवडाभरातच ही संख्या वाढली आहे. पालिकेने आत्तापर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात ६६ संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २६ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील १९ रुग्ण शहरातील आहेत. नाशिक शहरात पूर्व नाशिक भागात सहा, सिडको आणि पंचवटी भागात प्रत्येकी पाच, तर नाशिकरोड विभागात दोन याप्रमाणे रुग्ण आढळले आहेत. तीन नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने घर तपासणीवर भर दिला आहे. विविध भागांत ५८ हजार ६०० घरांना भेटी देण्यात आल्या असून, ४१ हजार ३५४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
शहरात आढळले डेंग्यूचे तब्बल २६ रुग्ण
By admin | Updated: July 25, 2014 00:41 IST