लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चोरी छुप्या पद्धतीने वाळू तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांपूर्वी नाशिकच्या प्रांत अधिकाऱ्यांनी पकडलेल्या वाळूच्या ३२ मालट्रक्स मालकांवर २६ लाखांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळू माफियांवर कारवाई करण्याची अलीकडची ही पहिलीच वेळ असली तरी, १६ ट्रकचालकांनी या कारवाईला विरोध दर्शवित, रिकाम्या गाड्यांवर दंडाची आकारणी कशी काय? असा सवाल केला आहे. नाशिक शहरात कोपरगाव, नंदुरबार, जळगावकडून मोठ्या प्रमाणावर चोरीच्या मार्गाने वाळू आणली जाते. साधारणत: पहाटेच्या सुमारास महामार्गावरून ताडपत्री झाकून वाळूची तस्करी केली जात असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अधून मधून कारवाई केली जात असली तरी, मध्यंतरीच्या काळात निफाडच्या महसूल पथकाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. परिणामी महसूल खात्याची कारवाई काहीशी मंदावली; मात्र चार दिवसांपूर्वी नाशिकचे प्रांत कैलास येणगे यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील पेठेनगर येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या ३२ वाळूच्या मालट्रक्सवर कारवाई केली. या ठिकाणी उभ्या असलेल्या १६ ट्रक्समध्ये वाळू भरलेली होती तर १६ ट्रक्स रिकामे होते. ज्या ट्रकमध्ये वाळू होती त्याबाबतची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे आढळून आल्याने प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करून मालट्रक्स ताब्यात घेण्यात आल्या. तर रिकाम्या मालट्रक्सदेखील वाळूच्याच असल्याने त्यातूनही वाळूची वाहतूक करण्यात आल्याचा निष्कर्ष काढून प्रत्येकाला एक ब्रास वाळूच्या हिशेबाने दंड ठोठावण्याचे ठरविण्यात आले. नाशिक तहसीलदारांनी या सर्व ट्रकचालकांना दंडाच्या नोटिसा बजावल्या असून, त्यातील १६ मालट्रक्स मालकांनी प्रशासनाच्या नोटिसींना हरकत घेतली आहे. मालट्रकमध्ये वाळूच नाही तर दंड कसा आकारला? अशी विचारणा त्यांनी केली आहे. या संदर्भात शुक्रवारी त्यांनी तहसीलदार कार्यालयात आपले लेखी म्हणणे मांडले आहे.
वाळू माफियांना २६ लाखांचा दंड
By admin | Updated: June 10, 2017 01:19 IST